Home Blog Page 3

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर’च्या सहकार्याने पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्न

चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये ‘वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर’च्या सहकार्याने पूल कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह संपन्न

संपादकीय,

इंदापूर: येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर यांच्या सहकार्याने पूल कॅम्पस ड्राइव्ह – २०२६ चे यशस्वी आयोजन करण्यात आले।

या पूल कॅम्पस ड्राइव्हचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर टीम तसेच पूल कॅम्पस ड्राइव्हसाठी उपस्थित विद्यार्थ्यांचे स्वागत करून सर्वांना मार्गदर्शन केले. त्यानंतर चेतना फाउंडेशनचे खजिनदार सोमनाथ माने सर यांनीही उपस्थितांना संबोधित करत शुभेच्छा दिल्या. पुढे वेलनेस फॉरएव्हरच्या मयूर डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना कॅम्पस ड्राइव्ह बाबत मार्गदर्शन केले.

या प्रसंगी मिलिंद कवितके, अश्विनी कवितके, आणि रोहित उराडे (वेलनेस फॉरएव्हर, इंदापूर शाखा) हे उपस्थित होते।

तसेच चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के, विभाग प्रमुख प्रा. डॉ. निलेश सोनवणे, प्रशिक्षण व नियुक्ती अधिकारी प्रा. प्राजक्ता गायकवाड, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते।

या उपक्रमामध्ये डी.फार्म व बी.फार्म विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणार्थी फार्मासिस्ट व वैद्यकीय प्रतिनिधी या पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. निवड प्रक्रिया समूहचर्चा व मानव संसाधन मुलाखत या टप्प्यांद्वारे पार पडली।

या कॅम्पस ड्राइव्हमध्ये जवळील विविध फार्मसी महाविद्यालयांमधून एकूण १८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला, त्यापैकी ३ विद्यार्थ्यांची फार्मासिस्ट पदासाठी निवड करण्यात आली असून त्यांना वेलनेस फॉरएव्हर प्रा. लि., इंदापूर यांच्याकडून नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे।

विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील संधी व आवश्यक कौशल्यां बाबत मार्गदर्शन मिळाले।

प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी विद्यार्थ्यांना अशा संधींचा लाभ घेऊन आपल्या करिअरची भक्कम पायाभरणी करण्याचे आवाहन केले।

या स्तुत्य उपक्रमास चेतना फाऊंडेशन चे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने व सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. रुचिता भंडारी यांनी केले.

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

संपादकीय,

इंदापूर: येथील चेतना कॉलेज ऑफ फार्मसी येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम वर्ष बी.फार्मसी च्या विद्यार्थिनी सुप्रिया पांढरे आणि राजनंदिनी गंगावणे यांनी प्रभावीपणे पार पाडले.

कार्यक्रमात सुरुवातीला विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. त्यानंतर प्रा. स्वप्निल पाटील सर यांनी शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन असून समानतेसाठी ते अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन केले. पुढे प्रा. किरण सातपुते सर यांनी विद्यार्थ्यांना महान व्यक्तींचे विचार आचरणात आणण्याचे, शिक्षण, कष्ट व प्रामाणिकपणाच्या जोरावर यश मिळवण्याचे तसेच समतामूलक समाज घडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यानंतर प्रा. अस्मिता चव्हाण मॅडम यांनी महात्मा फुले यांच्या कार्यावर तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनप्रवास व संघर्षाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अकॅडमिक डीन प्रा. गीतांजली कांबळे मॅडम यांनी आपल्या भाषणात नमूद केले की, या दोन्ही महान व्यक्तींचा समान उद्देश म्हणजे शिक्षणाचा प्रसार हा होता.

कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण सर्वांनी या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालले पाहिजे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथम वर्ष बी.फार्मसी विद्यार्थिनी वेदिका शिंदे हिने केले.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सोशल अँड एक्स्टेंशन अ‍ॅक्टिव्हिटी विभागामार्फत करण्यात आले असून या विभागाचे प्रभारी प्रा. किरण सातपुते आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या सामाजिक सहभागाच्या दृष्टीने NSS संबंधित उपक्रमांचाही समावेश करण्यात आला.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन भविष्याच्या दृष्टीने मार्गदर्शन मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला.

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज:- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

एआयच्या साहाय्याने शेतीला नवी दिशा; सध्या प्रयोगशील आणि आधुनिक शेतीची गरज:- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

संपादकीय,

पुणे : कृषी क्षेत्राला कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ची जोड देऊन उत्पादनवाढ साधता येईल आणि त्या उत्पादनाला सक्षम बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतीचे भविष्य अधिक उज्ज्वल होऊ शकते, असा विश्वास राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केला. यासाठी कृषी विद्यार्थ्यांनी प्रयोगशीलता, नवतंत्रज्ञानाचा स्वीकार आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्यावर भर देत कृषी शिक्षणाला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

पुणे कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेचा ३८ वा वर्धापनदिन कार्यक्रम सोमवार (ता. १३) रोजी महाविद्यालयातील शिरनामे सभागृहात उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात बोलताना भरणे यांनी शेतीत तंत्रज्ञानाच्या वाढत्या भूमिकेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष शेखर गायकवाड, उपाध्यक्ष हनुमंत मोहिते, प्रा. डॉ. जनार्दन कदम, कृषीचे माजी सचिव नानासाहेब पाटील, सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. महानंद माने, सचिव अतुल मारणे, अनिल महामुलकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माजी विशेष पोलिस महानिरीक्षक सुरेश खोपडे यांना ‘कृषी जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच प्रा. डॉ. रामचंद्र साबळे, नांदेड कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रमोद देशमुख आणि सचिन भालिंगे यांना ‘कृषी सन्मान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.

आपल्या भाषणात श्री.भरणे म्हणाले की, ज्येष्ठ हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी यंदाच्या मॉन्सूनबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. शेतकऱ्यांसाठी ही बाब आशादायी ठरावी, अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी चांगल्या पावसावर शेतकऱ्यांची स्वप्ने अवलंबून असल्याचे नमूद केले. योग्य पर्जन्यमान झाल्यास पीक उत्पादन आणि फळबागांची वाढ साध्य होते; मात्र पावसाअभावी मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते, असे त्यांनी स्पष्ट केले.

कृषी विभाग आणि शेतकरी यांचे अतूट नाते असल्याचे सांगताना भरणे यांनी कृषी शिक्षणाची भूमिका अधोरेखित केली. “शेतकरी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठे कष्ट घेतात. त्या अपेक्षांची पूर्तता करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी पार पाडली पाहिजे,” असे ते म्हणाले. स्वतःचा प्रवास सांगताना त्यांनी एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा ते विविध महत्त्वाच्या पदांपर्यंतचा प्रवास हा संधी आणि कर्तृत्वाच्या बळावर घडल्याचे सांगितले.

दिवंगत नेते अजित पवार यांनी व्यक्तीमधील गुण ओळखून संधी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला, असेही त्यांनी नमूद केले. सामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणे हीच आपली कार्यपद्धती असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर कृषी क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाची माहिती दिली. बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी नवीन वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या ५५-५६ वर्षांत विद्यापीठाने ३२० पेक्षा अधिक पिकांचे सुधारित वाण आणि ५५ नवीन कृषी यंत्रे विकसित केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेखर गायकवाड यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे अभिवादन

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांचे अभिवादन

संपादकीय,

पुणे, दि.१४: विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जोशी, तहसीलदार स्मिता माने, सहायक आयुक्त विशाल लोंढे आदी उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धा विजेत्यांना पारितोषिक तसेच भाग घेणाऱ्या स्पर्धकांना मिळणार प्रशस्तीपत्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कौशल्य विकास विभागाकडून निबंध स्पर्धा

विजेत्यांना पारितोषिक तसेच भाग घेणाऱ्या स्पर्धकांना मिळणार प्रशस्तीपत्र

 

मुंबई, १४ एप्रिल —

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने राज्यभरात निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये विचारप्रवर्तक लेखनाची आवड निर्माण करणे तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य विकास मंत्री श्री. मंगलप्रभातजी लोढा यांनी सांगितले.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य,समता, बंधुता या तत्वांसाठी आपले आयुष्य समर्पित करून समाजाला दिशा देण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य केवळ एका निबंधात मांडणे शक्य नाही. त्यामुळे आंबेडकर यांनी महिलांविषयी केलेले कार्य महिला साक्षमीकरणात त्यांनी दिलेले योगदान या विषयावर ही निबंध स्पर्धा होणार आहे.

 

*स्पर्धेचे स्वरूप*

या स्पर्धेत पहिल्या गटात शासकीय आयटीआय, खाजगी आयटीआय, तसेच आयटीआय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात. तर विषयासाठी विद्यार्थ्यांना५००ते ८०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

दुसरा खुला गट असून यात राज्यातील सर्व महिला आणि पुरुष सहभागी होऊ शकतात या गटाला ८०० ते १२०० शब्दांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. दोन्ही गटाला निबंध केवळ मराठी भाषेत सादर करावा लागणार आहे. स्पर्धेचा कालावधी १४ एप्रिल ते २० एप्रिल २०२६ हा निश्चित करण्यात आला आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणारे स्पर्धक ९१५२२३०१९३ या मोबाईल क्रमांकाशी संपर्क करू शकतात. त्याचबरोबर या स्पर्धेच्या नोंदणीसाठी क्यू आर कोड ही देण्यात आला आहे. नोंदणी केल्यावर स्पर्धकांना त्याची पोच ही मिळणार आहे.

या स्पर्धेद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, संविधानिक मूल्ये आणि नेतृत्वगुण विकसित करण्यावर भर दिला जात आहे. तसेच उत्कृष्ट निबंधांना पारितोषिके देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रशस्तीपत्र ही दिले जाणार असल्याची माहिती कौशल्य विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.

चेतना इंटरनॅशनल स्कूल, सरडेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

संपादकीय

चेतना इंटरनॅशनल स्कूल, सरडेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष उदय देशपांडे, सचिव विलास भोसले, खजिनदार सोमनाथ माने तसेच संस्थेच्या सदस्या व प्राचार्या निकिता माने मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

नर्सरीपासून सहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात उत्साहाने व आनंदाने सहभाग नोंदवला. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य मस्के सर, सुनील गायकवाड सर, प्रांजली सुतार मॅडम तसेच पालक प्रशांत गुरगुडे आणि राहुल यादव यांनी उपस्थिती दर्शवली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे सादर केली. सई भिसे, ओंकार टिपाले, राजवीर माने, आद्या जमदाडे आणि आदिती गायकवाड या विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. युवराज शिंदे सर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्याची थोडक्यात माहिती विद्यार्थ्यांना दिली, तर ज्योती शिंदे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

तसेच समर कॅम्पसाठी आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत व औक्षण मोरे मॅडम, डावरे मॅडम, उत्तेकर मॅडम आणि चव्हाण मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी गलांडे सर यांचे सहकार्य लाभले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन ज्योती शिंदे मॅडम यांनी केले असून सूत्रसंचालन गोळे मॅडम यांनी उत्कृष्टरीत्या केले.

अशा प्रकारे प्रेरणादायी आणि उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ – तिसरा टप्पा जाहीर; तरुणांसाठी मोठी संधी

 

पुणे, दि. 7 (जिमाका, वृत्तसेवा) : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना (PMIS) २०२६ च्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करण्यात आली असून देशभरात ३१,४८० पेक्षा अधिक इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या माध्यमातून पुणे जिल्ह्यातील तरुणांना नामांकित कंपन्यांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.

या योजनेअंतर्गत माहिती तंत्रज्ञान, बँकिंग व वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, रिटेल, ऑटोमोबाईल, औषधनिर्माण, उत्पादन, मीडिया, शिक्षण, पर्यटन, आरोग्य आदी विविध क्षेत्रांमध्ये इंटर्नशिप उपलब्ध आहेत. इंटर्नशिपचा कालावधी ६ ते ९ महिने असून दरमहा रु. ९,०००/- विद्यावेतन दिले जाणार आहे. इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र देण्यात येईल.

या योजनेंतर्गत उमेदवारांची पात्रता वय १८ ते २५ वर्षे, भारतीय नागरिकत्व आवश्यक, किमान १० वी, १२ वी, आयटीआय, डिप्लोमा किंवा पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. पूर्णवेळ नोकरी किंवा नियमित शिक्षण घेत असलेले उमेदवार अपात्र असतील. जे उमेदवार ऑनलाइन किंवा दूरस्थ शिक्षण घेत आहे ते उमेदवार पात्र आहेत.

इच्छुक उमेदवारांनी pminternship.mca.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज करावा. पुणे जिल्ह्यात विविध शैक्षणिक पात्रतेनुसार रिक्त पदे उपलब्ध असून इच्छुकांनी तातडीने अर्ज करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,४८१, रास्ता पेठ, पुणे दूरध्वनी : ०२०-२६१३३६०६ येथे संपर्क साधावा.

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

भारतीय जनगणना-२०२७ करिता ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’वापर करावा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

संपादकीय

पुणे, दि. ७: भारतीय जनगणना -२०२७ च्या अनुषंगाने माहितीचे संकलन अधिक जलद, अचूक व पारदर्शक पद्धतीने होण्याकरिता भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त यांच्या कार्यालयामार्फत प्रगणकांद्वारे ‘HLO मोबाईल अॅप्लिकेशन’विकसित करण्यात आले आहे. यामुळे कागदी काम गतीने होण्यासोबतच वेळ व श्रमाची बचत होणार आहे, जनगणनेच्या कामाकरिता प्रगणकांनी या अॅप्लिकेशनचा प्रभावीपणे वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

 

मोबाईल अॅप केवळ गुगल प्ले स्टोअर तसेच अॅपल अॅप स्टोअर वरूनच डाउनलोड करावे. गुगल प्ले स्टोअर किंवा अॅपल अॅप स्टोअरवरून अॅपचे अपडेट वेळोवेळी तपासावेत आणि अॅप अद्ययावत असल्याची खात्री करुन घ्यावी. मोबाईल अॅपमध्ये लॉगिन व त्याचा वापर केवळ एकाच नोंदणीकृत मोबाइल उपकरणावर करावे. उपकरणाची नोंदणी फक्त एकाच युजर आयडी लॉगिनसाठी करावी. आपले मोबाईल उपकरण, प्राधिकृत (चार्ज) अधिकारी यांनी जनगणना व्यवस्थापन व देखरेख प्रणाली (सीएमएमएस) वर घरयादी गटाच्या (एचएलबी) वाटपानंतरच नोंदणीकृत करावा. लॉगिनसाठी आवश्यक क्रेडेन्शियल्सचा तपशील चार्ज अधिकारी एसएमएस, ई-मेलद्वारे पुरविण्यात येणार आहे.

सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोबाइल अॅपचा डीफॉल्ट पासवर्ड बदलावा. मोबाइल अॅप स्क्रीनवर दर्शविलेले स्थानासंबंधी तपशील नियुक्तीपत्रातील दर्शविलेल्या तपशिलानुसार असल्याची खात्री करावी आणि खात्री केल्यानंतरच आपणास दिलेल्या घरयादी गटाच्या क्षेत्रीय कार्याला सूरुवात करावी. कोणत्याही अडचणीच्या बाबतीत, स्थानाच्या तपशीलामध्ये कोणतीही विसंगती आढळल्यास, उपकरण नोंदणीस अडथळा निर्माण झाल्यास त्वरित चार्ज अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

प्रत्येक ५-६ घर, कुटुंबाची माहिती प्रविष्ट केल्यानंतर, ही माहिती केंद्रीय सर्व्हरवर अपलोड/सिंक करावी जेणेकरून माहिती गमावण्याची शक्यता टाळता येईल. ‘सिंक’ बटणावर क्लिक केल्यानंतर घरयादी गट पूर्ण झाल्याची पुष्टी करण्यासाठी चेक बॉक्सवर (✔) टिक करणे लक्षात ठेवावे. त्यानंतर रिक्त भागात तुमची स्वाक्षरी करून शेवटी ‘जतन करा’ या बटनावर क्लिक करावे. क्षेत्रीय कार्यादरम्यान आपले मोबाइल उपकरण सुरक्षित ठेवावे, तसेच कोणत्याही अनधिकृत व्यक्ती व लहान मुलांपासून दूर ठेवावा.

भारतीय जनगणना -२०२७ च्या कामाकरिता आपल्याकडे येणाऱ्या प्रगणकांना आपल्याशी निगडित वस्तुनिष्ठ माहिती देवून सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – १/५) (ऊर्जा विभाग)

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – १/५)

 

(ऊर्जा विभाग)

 

*महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी – महावितरणची आर्थिक पुनर्रचना*

*महावितरणचा आयपीओ येणार ; कृषि वीज पुरवठ्यासाठी स्वतंत्र वितरण कंपनी*

 

 

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) कंपनीचे औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती व इतर सर्व बिगर कृषि ग्राहकांसाठीची वितरण संस्था आणि कृषि ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एमएसईबी सोलार ॲग्रो पॉवर लिमिटेड (एमएसएपीएल) असे विभाजन करून दोन स्वतंत्र कंपन्या स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

 

बिगर कृषि वितरण क्षेत्रातील महावितरण या कंपनीला भांडवली बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी आयपीओ आणण्यास देखील या बैठकीत मान्यता देण्यात आली. महावितरण कंपनीने विविध पायाभूत योजनांसाठी घेतलेल्या सुमारे ३२ हजार ६७९ कोटी रुपयांच्या कर्जास शासन हमी आहे. या कर्ज दायित्वापोटी महाराष्ट्र शासन पंधरा वर्षे मुदतीचे दीर्घकालिन सरकारी रोखे जारी करणार आहे. यामुळे महावितरणवरील कर्जाचा बोजा कमी होऊन आर्थिक स्थिती आणखी चांगली होण्यास मदत होणार आहे.

 

राज्यातील ग्राहकांना ऊर्जा सुरक्षा आणि गुणात्मक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणची आर्थिक स्थिती भक्कम करणे आणि वितरण व्यवस्थेत शाश्वतता निर्माण करण्यासाठी ही पुनर्रचना करण्यात येणार आहे. ऊर्जा क्षेत्रातील बाजारपेठीय संधीचा लाभ घेण्यासाठी अशा दोन कंपन्यांची निर्मिती केली जाईल. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या शिफारशी तसेच मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना २.० च्या धोरणात्मक उद्दिष्टानुसार एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड ही कंपनी ३१ मे २०२३ रोजी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीच्या माध्यमातून शेतीसाठीच्या वीज पुरवठ्याचे नियोजन आणि सौर ऊर्जेवर आधारित कृषि ऊर्जा प्रणाली विकसित करण्यासाठी संस्थात्मक आधारभूत रचना निर्माण होणार आहे.

 

महावितरणाच्या आर्थिक पुनर्रचनेनंतर राज्यातील वीज वितरण व्यवसाय दोन स्वतंत्र कंपन्याकडून केले जाईल. यात कृषि वितरण संस्था म्हणजेच एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड- एमसएएपीएल कंपनी केवळ कृषि ग्राहकांना वीज पुरवठा व संबंधित सेवा उपलब्ध करून देईल. तर अकृषिक वितरण संस्था म्हणजेच महावितरण औद्योगिक, वाणिज्यिक, घरगुती आणि इतर बिगर कृषि ग्राहकांना सेवा पुरवेल. या दोन्ही कंपन्यांचा वीज विक्री, महसूल व खर्चाचा तपशील यांचा लेखा-जोखा स्वतंत्रपणे मांडला जाईल. विभाजनानंतर सहा ते नऊ महिन्यांच्या कालावधीत महावितरण आयपीओ आणला जाईल. त्यासाठी सेबीकडे आवश्यक त्या मंजुरी व वित्तीय प्रक्रिया पूर्ण केल्या जातील. महावितरणचा आयपीओ – नवीन समभाग (फ्रेश इश्यू) आणि शासनाकडील समभाग विक्री (ऑफर फॉर सेल) याद्वारे आणला जाईल. यामुळे महावितरणाला विस्तारासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होईल. यातून स्मार्ट मिटरिंग व डीजिटल वितरण प्रणाली, ऊर्जा संक्रमणाशी संबंधित गुंतवणूक, वितरण व्यवस्थेचे आधुनिकीकरण हे करता येणार आहे.

 

नवीन स्थापन होणाऱ्या कृषि वितरण कंपनी एमएसएपीएलला सुरूवातीचे भांडवल म्हणून अडीच हजार कोटी रुपयांचे उपलब्ध करून देण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

 

या दोन्ही कंपन्यांच्या स्थापनेमुळे कृषि तसेच औद्योगिक, घरगुती ग्राहकांना स्थिर व अखंडित वीज पुरवठा उपलब्ध करून देता येणार आहे. विशेषत: शेतकऱ्यांना दिवसा व अखंडित वीज पुरवठा मिळणार आहे. कृषि क्षेत्राच्या सिंचनासाठी आवश्यक सौर ऊर्जिकरणाला चालना मिळणार आहे. औद्योगिक ग्राहकांना स्थिर व अखंडित वीजपुरवठा, दरवाढीवरील ताण कमी होणार, हरित ऊर्जेच्या वापरासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच घरगुती ग्राहकांसाठी वीज दरांमध्ये अधिक स्थिरता येईल, सेवा गुणवत्तेमध्ये सुधारणा, डीजिटल बिलिंग व ग्राहक सेवा अधिक सक्षम होणार आहे.

*****

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – ४/५) (नियोजन विभाग) महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर-(MRSAC) आता कंपनी

मंत्रिमंडळ निर्णय (एकूण – ४/५)

(नियोजन विभाग)

 

*महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटर-(MRSAC) आता कंपनी*

*रस्ते, नगररचना, जलयुक्त शिवार, डोंगरी विकास, ई- पंचनामा, खनिज व्यवस्थापनाला गती लाभणार*

महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर (MRSAC) संस्थेची सोसायटी कायद्यांतर्गत असलेली नोंदणी रद्द करून संस्थेची कंपनी म्हणून नोंदणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नियोजन आणि निर्णय प्रक्रियेत भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी राज्य शासनाने १९८८ मध्ये महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरची (MRSAC) स्थापना केली होती. सेंटरची पुणे आणि मुंबई येथे उपकेंद्रे आहेत. MRSAC ने भौगोलिक माहितीच्या आधारे रस्ते, नगररचना विभागाच्या प्रादेशिक योजना, जलयुक्त शिवार, पाणलोट विकास योजना, ई-पंचनामा, महाॲग्रिटेक, कांदळवन अभ्यास, भूजल व्यवस्थापन, खनिज आणि खाणी इत्यादींचा अभ्यास केलेला आहे. आता MRSAC च्या विविध प्रकल्पामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग, आयओटी, वेब सेवा, क्लॉऊड काम्प्युटिंग यासारख्या तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला. यामुळे MRSAC समोरील आव्हाने आणि भूमिकेतील होणारा बदल लक्षात घेऊन MRSAC संस्थेची सोसायटी अधिनियम, १८६० कायद्यांतर्गत असलेली नोंदणी रद्द करून कंपनी अधिनियम, २०१३ मधील कलम ८ अंतर्गत कंपनीत रूपांतरित करण्यास आज मान्यता देण्यात आली.

कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय नागपूर येथे असेल. कंपनीचे अध्यक्ष मुख्य सचिव असतील. कंपनीसाठी व्यवस्थापकीय संचालक पद नव्याने निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच अस्तित्वात असलेल्या पदांना कंपनीअंतर्गत कार्यरत ठेवण्यासही मान्यता देण्यात आली.

कंपनीच्या संचालक मंडळाची रचना पुढीलप्रमाणे :- मुख्य सचिव-अध्यक्ष, अपर मुख्य सचिव (वित्त), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव/सचिव (नियोजन), अपर मुख्य सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (नगर विकास-१), अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव (ग्राम विकास), प्रधान सचिव/सचिव (माहिती तंत्रज्ञान), जिओ स्पेशल डाटा सेंटर, पुणे यांचे प्रतिनिधी, आयआयएसईआर, पुणे यांनी नियुक्त केलेले प्रतिनिधी, संचालक, जिऑलॉजी ॲण्ड मायनिंग, नागपूर, नामांकित/तज्ञ वैज्ञानिक (२), प्रधान मुख्य वनसंरक्षक, नागपूर, व्यवस्थापकीय संचालक, MRSAC, मुख्य वित्त व लेखा अधिकारी, MRSAC

(नियोजन विभाग)

*महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर-महाजिओटेक कंपनी स्थापन होणार*

*भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासनात गतिमानता*

भू-स्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाराष्ट्र जिओटेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर-महाजिओटेक कंपनी स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

नवीन महाराष्ट्र जिओस्पेशिअल टेक्नॉलॉजी अॅप्लिकेशन सेंटर (महाजिओटेक) कंपनीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान विभाग, संशोधन व प्रशिक्षण विभाग, भूस्थानिक नवोपक्रम व उद्योजकता विभाग आणि प्रशासन व लेखा असे चार विभाग असतील. आधुनिक तंत्रज्ञान विभागांतर्गत ॲप्लिकेशन व डेव्हलपमेंट हे दोन उपविभाग असतील. ॲप्लिकेशन उपविभागांतर्गत कृत्रिम बुध्दिमत्ता, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, इमेज प्रोसेसिंग आणि फोटोग्रामेट्री या संदर्भातील धोरणे विकसित करणे व अंमलात आणणे, डेटा गुणवत्ता, अखंडता आणि सुरक्षितता निर्धारित करणे, ही कामे करण्यात येतील. तर डेव्हलपमेंट उपविभागांतर्गत भू-स्थानिक पोर्टल विकसित करणे व देखभाल करणे, सॉफ्टवेअर अॅप्लिकेशनचे डिझायनिंग आणि अंमलबजावणी, विविध प्रकारच्या विदा (डेटा) चे एकत्रिकीकरण करण्यासाठी आराखडे तयार करण्यात येतील. तसेच गुंतागुंतीच्या समस्या सोडविण्यासाठी विश्लेषणात्मक पध्दती राबविण्यात येईल.

संशोधन व प्रशिक्षण विभागात संशोधन व प्रशिक्षण असे दोन उपविभाग असतील. संशोधन उपविभागात भू-स्थानिक तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधन व विकासाचे कार्ये केले जाईल. प्राधान्यक्रम निश्चित करून विद्यार्थी, व्यावसायिक आणि संशोधकांसाठी शैक्षणिक कार्यक्रम राबविले जातील. प्रशिक्षण उपविभागांतर्गत भू-स्थानिक कार्यक्रमात सहभागी संस्था, वापरकर्ते विभाग यांचे कौशल्य आणि ज्ञान वाढविण्यासाठी प्रशिक्षण घेण्यात येईल. भूस्थानिक नवोपक्रम व उद्योजकता विभागात नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी कार्यक्रम आखण्यात येतील. बिझनेस रिइंजिनिअरिंगसाठी खाजगी क्षेत्रातील संस्था, स्वयंसेवी संस्था आणि शासकीय संस्थांचा सहभाग घेण्यात येईल.

या संस्थेचे मुख्यालय मुंबई येथे असेल. संस्थेच्या उभारणीसाठी सुरूवातीचा खर्च म्हणून 25 कोटींचे अनुदान देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

(आपत्ती व्यवस्थापन विभाग)

*महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम (MRDP) राबविण्यास मंजुरी*

*आपत्ती व्यवस्थापनात खाजगी भांडवलाच्या मदतीने वित्तपुरवठा*

राज्यात महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र रिझिलन्स फायनान्सिंग प्रोग्राम या नवीन संकल्पनेला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या कार्यक्रमांतर्गत जागतिक बँकेकडून मिळणाऱ्या 165 कोटी रूपये निधीचा आपत्तीत फटका बसलेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी मदत होणार आहे. आपत्तीग्रस्तांना गृह कर्जात तसेच त्या परिसरातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत तसेच विमा सुरक्षा उपलब्ध होणार आहे. यात असंघटीत क्षेत्रातील कामगार तसेच महिला उद्योजक, बांधकाम, तसेच अन्य व्यावसायिक क्षेत्रातील छोट्या घटकांनाही मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन-मित्रा येथे अंमलबजावणी गट स्थापन करण्यात येणार आहे. पूर, उष्णतेची लाट, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीत या घटकांना वित्तीय सहायता करता येणार आहे.

आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी विभाग, जिल्हा, शहर स्तरावरील प्रशासनांच्या प्रतिसाद क्षमता वाढविण्यासंदर्भात अंमलबजावणी गट म्हणून मित्रा संस्था काम करणार आहे. कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी शहरांसह, कृष्णा खोऱ्यातील पूराचा धोका कमी करण्यासाठी प्रतिबंधक आराखडे तयार कऱण्यात येतील. यात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णा व पंचगंगा नदी क्षेत्रातील कामांसाठी महाराष्ट्र मृद व जलसंधारण महामंडळ प्रकल्प अंमलबजावणी गट म्हणून काम करेल. या प्रकल्पांवरील देखरेखीसाठी आपत्ती व्यवस्थापन मंत्री व जलसंपदा मंत्री यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली प्रकल्प मूल्यांकन समिती स्थापन करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

 

(माहिती तंत्रज्ञान विभाग)

*महाराष्ट्रात नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभाग*

*आयुक्तालयासह जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदे; नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग*

विकसित महाराष्ट्राचे ध्येय गाठण्यासाठी राज्यात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुध्दीमत्ता विभागाची निर्मिती करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

या निर्णयामुळे मंत्रालयीन विभाग, आयुक्त कार्यालय व सर्व जिल्ह्यांसाठी कायमस्वरुपी पदांचा समावेश असलेले नवीन माहिती तंत्रज्ञान संवर्ग (IT Cadre) निर्माण होणार आहे. यात सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेले माहिती तंत्रज्ञान कार्यासन वेगळे करून हा विभाग स्थापन करण्यात येणार आहे. तसेच माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचे रूपांतर करून नवीन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रीम बुध्दीमत्ता आयुक्तालय स्थापन करण्यात येणार आहे. या आयुक्तालयासाठी 77 पदे निर्माण करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील व इतर प्रशासकीय विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयामधील माहिती तंत्रज्ञानविषयक कामकाज हाताळण्यासाठी 427 पदांचा स्वतंत्र माहिती तंत्रज्ञान संवर्ग निर्माण करण्यात येणार आहे. याचप्रमाणे प्रोजेक्ट मॅनेजमेंट तसेच कार्यान्वित झालेल्या प्रकल्पांच्या देखरेख-नियंत्रणासाठी तांत्रिक संवर्गातील 389 पदांकरिता बाह्य यंत्रणेद्वारे भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी महाराष्ट्र ई-मिशन टीम (एमईएमटी) स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय या विभागासाठी आवश्यक मनुष्यबळ तयार व्हावे, याकरिता अभियांत्रिकी पदवी शिक्षण झालेल्या 200 विद्यार्थ्यांसाठी अंतरवासिता (इंटर्नशिप) कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

राज्यातील नागरिकांना शासनाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन स्वरुपात उपलब्ध करून देणे, ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासनाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध योजना व कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे, त्याचबरोबर राज्यातील संशोधन, तंत्रज्ञान व नवोपक्रम क्षेत्रातील प्रगतीचा एकात्मिक व समन्वित उपयोग करणे, राज्यासमोर असलेल्या विकासात्मक गरजा, प्रशासकीय आव्हाने व तंत्रज्ञानाधारित उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी धोरणनिर्मिती, अंमलबजावणीच्या कामांना वेग मिळणार आहे. स्वतंत्र विभाग स्थापन झाल्यामुळे डिजिटल सेवा, डेटा-आधारित निर्णय प्रक्रिया, सायबर सुरक्षा व उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा नियोजनबद्ध वापर करणे शक्य होणार आहे. त्याचबरोबर पारंपरिक ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून शाश्वत शेती, आरोग्यसेवा, अक्षय ऊर्जा, स्वदेशी उत्पादन तसेच अन्य महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये या निर्णयामुळे विविध स्तरांवर प्रशासन अधिक सुलभ, पारदर्शक व नागरिक-केंद्रित होण्यास मदत होणार आहे.

या विभागाच्या पदनिर्मितीसाठी आवश्यक सुमारे 133 कोटी 35 लाख रुपयांच्या वार्षिक खर्चासही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली.

*****

error: Content is protected !!