श्री हनुमान विद्यालय मध्ये विद्यार्थ्यांचा पालखी सोहळा साजरा…….
संपादकीय:-
श्री हनुमान विद्यालय अवसरी मध्ये जिल्हा परिषद शाळा व माध्यमिक शाळा यांच्यावतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात विद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.
या सोहळ्यात विद्यार्थ्यांनी विठ्ठल – रुक्मिणी जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज व वारकरी वेशभूषा परिधान करून गावामध्ये पालखी वीणा, तुळस, टाळ-मृदुंग यांच्या साथीने “ज्ञानोबा-तुकाराम”, “राम कृष्ण हरी” या नामगजरात पालखीची मिरवणूक काढली. अभंग, भजन ,फुगडी व पारंपारिक खेळ आणि विठ्ठल नामस्मरणामुळे संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा, वारकरी संप्रदायाचा तसेच भक्ती, संस्कार, समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला. वेळी विद्यार्थ्यांनी मनसोक्त फुगड्या व पारंपारिक खेळ खेळण्याचा आनंद घेतला . विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने या पालखी सोहळ्यात हिरेरीने सहभाग घेतला.
विद्यार्थ्यांचे गावामध्ये व पंचक्रोशी मध्ये सर्व स्तरांतून कौतुक करण्यात आले.गावामध्ये दारोदारी सडा रांगोळी काढून पालखीचे व वेशभूषा परिधान केलेले विठ्ठल – रुक्मिणी व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची महिलांनी व आबाल वृद्धांनी पूजा केली व दर्शन घेतले .काही विद्यार्थ्यांनी गोपीचंद -अष्टगंध -बुक्का लावण्याची सेवा केली .गावातील लोकांनी रमणीय दृश्य पाहून मोबाईल मध्ये फोटो काढले . “संतांच्या विचारांचा वारसा जपूया, भक्ती-संस्कारांची परंपरा पुढे नेऊया” असा संदेश या पालखी सोहळ्यातून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे संस्थापक अरुण दादा शिंगटे सचिव विजया शिंगटे, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रवीण लोंढे सहशिक्षक नाना घळके, तानाजी राऊत, दत्तात्रय गवळी, अरुण रसाळ, अरुणा कवडे, ज्योती लोंढे, मीरा घळके, तेजल कारंडे, शांतीनाथ शिंदे पाटील, हरिदास कवितके, राजेंद्र पेंडवळे, प्रकाश मगर , अजिंक्य जाधव, तसेच अवसरी ग्रामस्थ , पालक,व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.