Home शैक्षणिक चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहात साजरा

 

सरडेवाडी, ता. इंदापूर : चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी येथे राष्ट्रीय डॉक्टर्स डे उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इंदापूर येथील डॉ. राहुल जाधव हे उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व धन्वंतरी पूजनाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. राहुल जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉक्टरांचा समाजातील अनमोल वाटा, वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्ये, रुग्णसेवा आणि आरोग्य जनजागृती याविषयी सविस्तर विचार मांडले. त्यांनी विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबत सेवाभाव, संवेदनशीलता आणि व्यावसायिक प्रामाणिकता जपावी, असे आवाहन केले.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा दिवस समाजासाठी अहोरात्र कार्य करणाऱ्या डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आजारपण, अपघात, महामारी किंवा कोणत्याही आरोग्यविषयक संकटाच्या काळात डॉक्टर आपल्या ज्ञान, कौशल्य आणि सेवाभावाच्या बळावर रुग्णांना नवजीवन देण्याचे कार्य करतात. त्यामुळे समाजात डॉक्टरांचे स्थान अत्यंत मानाचे आणि आदरणीय आहे.

राष्ट्रीय डॉक्टर्स डे हा केवळ डॉक्टरांचा सन्मान करण्यापुरता मर्यादित नसून समाज आणि आरोग्यसेवा यांच्यातील विश्वास, सहकार्य आणि परस्पर आदर अधिक दृढ करणारा दिवस आहे. डॉक्टरांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना नागरिकांनीही आरोग्याविषयी सजग राहून वैद्यकीय सल्ल्याचे पालन करणे, आरोग्यदायी सवयी अंगीकारणे आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी सहकार्य करणे आवश्यक आहे.

प्रमुख पाहुणे डॉ. राहुल जाधव यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत नैराश्य (डिप्रेशन), चिंता (अॅन्झायटी), ताण-तणाव आणि इतर मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या वेगाने वाढत आहेत. मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे असून, या समस्यांकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

त्यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मानसिक आजारांविषयी समाजात असलेला गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. नैराश्य किंवा चिंतेची लक्षणे दिसल्यास ती लपविण्याऐवजी कुटुंबीय, मित्र किंवा मानसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी, असे त्यांनी सांगितले. नियमित व्यायाम, संतुलित आहार, पुरेशी झोप, ध्यान-योग आणि सकारात्मक विचारसरणी यांमुळे मानसिक आरोग्य चांगले राखण्यास मदत होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांपैकी सुप्रिया पांढरे, राजनंदिनी खबाले, आरती कारंडे आणि संग्राम गायकवाड यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त मनोगते व्यक्त केली. त्यांनी डॉक्टरांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम करत समाजाच्या आरोग्यरक्षणासाठी त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच आरोग्य जनजागृती, निरोगी जीवनशैली आणि फार्मासिस्टची भूमिका याविषयी प्रभावी विचार मांडले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी डॉक्टरांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारी भाषणे सादर केली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.

शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. गीतांजली कांबळे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स डेचे महत्त्व विशद करताना आरोग्य क्षेत्रात फार्मासिस्ट आणि डॉक्टर यांच्यातील समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले.प्रा. स्वप्नील पाटील यांनी विद्यार्थ्यांना रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा, नैतिक मूल्ये आणि सामाजिक उत्तरदायित्व याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉक्टरांच्या सेवाभावी वृत्तीचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारून समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी प्रभावीपणे केले. तर आभार प्रदर्शन प्रा. रुचिता भंडारी यांनी केले. कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यशस्वीरीत्या केले. राष्ट्रीय डॉक्टर्स डे निमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यसेवेबद्दल आदर, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभावाची भावना अधिक दृढ झाली.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले तसेच कोषाध्यक्ष श्री. सोमनाथ माने, सदस्य बाळासाहेब बोराटे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!