चेतना कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या डी- फार्मसी अभ्यासक्रम प्रथम बॅचच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न
संपादकीय,
चेतना फाउंडेशनच्या अंतर्गत कार्यरत चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, येथे द्वितीय वर्ष डी-फार्मसी विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:३० वाजता महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. उदय देशपांडे, सचिव मा. श्री. विलास भोसले, खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने, सदस्य मा. श्री. बाळासाहेब बोराटे तसेच प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
प्रास्ताविका मध्ये कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. निरोप समारंभ हा केवळ निरोप देण्याचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे अधोरेखित करण्यात आले. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी नृत्य, गीत, कविता व विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करून वातावरण उत्साहपूर्ण केले. तसेच काही विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमधील अनुभव, आठवणी आणि भावना व्यक्त करताना आपले मनोगत मांडले, ज्यामुळे सभागृहात भावनिक वातावरण निर्माण झाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रामाणिकपणा, सेवा भाव आणि नैतिक मूल्ये जपण्याचे आवाहन केले. “फार्मसी क्षेत्र हे केवळ व्यवसाय नसून मानव सेवेचे माध्यम आहे. तुम्ही जिथे जाल तिथे तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या आरोग्यासाठी करा,” असे ते म्हणाले.
तसेच वर्गशिक्षिका प्रा. तनुजा काशीद, डीन अकॅडमिक्स प्रा. गीतांजली कांबळे आणि प्रा. चिंतामणी रणवरे यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी शुभेच्छा देत, कठोर परिश्रम, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन आकर्षक पद्धतीने पार पडले. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व उत्कृष्ट आयोजन प्रा. प्राजक्ता झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम वर्ष डी-फार्मसी विद्यार्थ्यांनी केले. त्यांच्या परिश्रमा मुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला.
संस्थेचे खजिनदार मा. श्री. सोमनाथ माने सर यांनी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा देताना, कॉलेजमध्ये मिळवलेले ज्ञान, अनुभव आणि मैत्री हीच त्यांच्या आयुष्यभराची अमूल्य संपत्ती असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने करण्यात आला. हा निरोप समारंभ विद्यार्थ्यांच्या मनात कायमस्वरूपी आठवणींचा ठेवा निर्माण करून गेला.