चेतना कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राष्ट्रीय युवा दिन व स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जयंती उत्साहात साजरी
संपादकीय
चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, येथे आज सोमवार दि. १२ जानेवारी २०२६ रोजी राष्ट्रीय युवा दिन व स्वराज्यप्रेरिका राजमाता जिजाऊ जयंती विविध शैक्षणिक, सामाजिक व प्रेरणादायी उपक्रमांच्या माध्यमातून अत्यंत शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे विधीवत पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वामी विवेकानंद यांच्या राष्ट्रउभारणीस पोषक विचारांवर तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारशील, दूरदृष्टीपूर्ण व राष्ट्रनिष्ठ जीवनकार्यावर सविस्तर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळासाहेब बोराटे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के यांनी प्रतिपादन केले की, स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या युवा पिढीसाठी दिशादर्शक असून आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती, आत्मशिस्त व राष्ट्रभक्ती या मूल्यांच्या आधारे युवकांनी आपले जीवन घडवावे. तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारांमधूनच छत्रपती शिवाजी महाराज यांसारखा आदर्श राजा घडला असून त्यांच्या जीवनातील मूल्ये आजच्या युवकांसाठी मार्गदर्शक आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी प्रा. ऋतुजा धायगुडे यांनी आपल्या भाषणात राजमाता जिजाऊ यांच्या मातृत्वातील संस्कार, शिस्त, त्याग व राष्ट्रप्रेम यांचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी जिजाऊ मातांच्या विचारांचा अंगीकार करून सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सकारात्मक योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले.
तसेच प्रा. किरण सातपुते यांनी स्वामी विवेकानंद यांच्या युवकांसाठी दिलेल्या प्रेरणादायी संदेशांचा संदर्भ देत, युवकांनी स्वतःच्या क्षमतांवर दृढ विश्वास ठेवून निश्चित ध्येय समोर ठेवत सातत्यपूर्ण परिश्रम करावेत. विवेकानंदांचे विचार आत्मसात केल्यास सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साध्य होतो, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी मनोगते, विचारप्रदर्शन व प्रेरणादायी संदेशांच्या माध्यमातून राष्ट्रसेवा, सामाजिक जाणीव, नैतिक मूल्ये व युवकांची राष्ट्रउभारणीतील भूमिका यांचे महत्त्व प्रभावीपणे मांडले. संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, नियोजन व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन प्रा. प्राजक्ता झगडे यांनी केले. बी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थी संग्राम गायकवाड यांनी प्रभावी व अभ्यासपूर्ण सूत्रसंचालन केले, तर डी. फार्मसी प्रथम वर्षातील विद्यार्थिनी अपेक्षा कांबळे यांनी समर्पक शब्दांत आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.