
चेतना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंती दिमाखात साजरी
गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी चेतना फाउंडेशन संचलित चेतना कॉलेज ऑफ फार्मसी, सरडेवाडी, इंदापूर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती अत्यंत उत्साहात व दिमाखात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांद्वारे या दोन्ही महान नेत्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु. अरुणा कोटी हिने दोन्ही महापुरुषांच्या जीवनकार्यावर प्रभावी भाषण केले. द्वितीय वर्ष बी. फार्मसी मधील कु. वैष्णवी शेंडगे हिने देखील प्रेरणादायी वक्तव्य केले. कु. रोहिणी चोपडे हिने सुंदर असे देशभक्तीपर गीत सादर करून कार्यक्रमाला सुरेल वातावरण दिले, तर चि. अमित शिंदे ह्यानेही दोन्ही महान नेत्यांच्या विचारांवर प्रभावी भाषण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कु. प्रियंका हांगे हिने अत्यंत प्रभावीपणे केले. तिच्या संयोजनामुळे संपूर्ण कार्यक्रम आकर्षक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चेतना कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गणेश म्हस्के होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी म्हटले की, “२ ऑक्टोबर हा दिवस भारतीयांसाठी विशेष आहे, कारण या दिवशी आपल्याला दोन महान व्यक्तिमत्त्वांची आठवण येते – महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री. गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा आणि शांतीचा संदेश दिला, तर शास्त्रीजींनी आपल्या साध्या पण प्रभावी नेतृत्वातून ‘जय जवान, जय किसान’ या घोषणेने देशाला प्रेरणा दिली.”
डॉ. म्हस्के पुढे म्हणाले की, “लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या केवळ १८ महिन्यांच्या कार्यकाळात देशाला युद्धात विजय मिळवून दिला आणि अन्नसंकटावर मात केली. त्यांचे नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि समर्पण आजही देशवासीयांसाठी प्रेरणादायी आहे.”
या प्रसंगी चेतना फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. उदय देशपांडे, सचिव श्री. विलास भोसले, खजिनदार श्री. सोमनाथ माने, सदस्य श्री. बाळू बोराटे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका वृंद उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाचे औचित्य अधिक वाढले.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन राष्ट्रीय सेवा योजना (NSS) चे कार्यक्रम अधिकारी प्रा. किरण सातपुते व प्रा. अनिकेत सुर्वे यांनी केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि अनुशासनबद्ध पद्धतीने पार पडला.