मुंबई:- राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार कमबॅक केलं आहे. पुढील पाच दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. विदर्भासह मध्य महाराष्ट्र व कोकणात हवामान विभागाने हाय अलर्ट दिले आहेत. मराठवाड्यात पुढील चार दिवस काही जिल्ह्यात पावसाची हजेरी राहणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने महाराष्ट्रात पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाने वर्तवली आहे. संभाव्य पावसाचा अंदाज लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून करण्यात आले आहे.
सचेत ॲपमार्फत नागरिकांना सूचना आपत्तीपासून सतर्क राहण्यासाठी सद्यस्थितीमध्ये नागरीकांना सचेत ॲपमार्फत अलर्ट संदेश पाठविले जात आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना आपत्कालीन परिस्थिती करिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, राज्यात आजपासून ते 21 ऑगस्ट 2024 दरम्यान अतिवृष्टीसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. ज्यामध्ये कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीसह अत्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.
तर मराठवाडामध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ज्यामध्ये वीज चमकणे, गडगडाटांसह 40-50 किमी प्रति तास वादळी वारे वाहण्याची ही शक्यता वर्तवली आहे. वाशिम जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या पावसाच्या अंदाजानुसार आज सकाळी पुन्हा एकदा मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. परिणामी प्रशासनाने जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असून आवश्यकता असेल तरच घरा बाहेर पडा, सखल भागात किंवा नदी, नाल्याकाठी असल्यास सुरक्षित ठिकाणी आसरा घेण्याच आव्हान करण्यात आलंय. रायगड जिल्ह्यातील अंबा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. तसेच कुंडलीका नदी आणि रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी आणि कोदवली नदीने इशारा पातळी ओलांडली असून याबाबत नागरिकांना सूचित करण्यात आले आहे. नागरिकांनी पूरस्थिती पासून सुरक्षित राहण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सूचना देण्यात आल्या आहेत. तर खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.