कीव:-रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष थांबता थांबत नसून यु्क्रेनने यावेळी रशियात घुसून हल्ला केला आहे. थेट लक्ष्यांना टार्गेट करत रशियातील लष्करी तळ आणि तेल कारखानाच उडवला आहे. या हल्ल्यात रशियातील दोन्ही ठिकाणांची राखरांगोळी झाली आहे. तसेच यात तिघांचा मृत्यू झाला, त्यामुळे आता दोन्ही देशातील संघर्ष आणखीनच तीव्र झाला आहे.
युक्रेन आणि रशियामधील सुरू असलेल्या युद्धाने पुन्हा नवा संघर्ष उभा केला आहे. सीमेवरच नाही तर आता दोन्ही देश परस्परविरोधात अंतर्गत हल्ले करत आहेत. रशियाच्या अंतर्गत महत्वपूर्ण भागांना लक्ष्य करून युक्रेनने आपले लष्करी किती लांब पल्ल्याची आहे हे दाखवून देण्याचाच हा प्रयत्न केला आहे. शुक्रवारी रात्रीपासून सुरू झालेल्या युक्रेनियन ड्रोन हल्ल्यांच्या मालिकेमुळे रशियाच्या तेल पायाभूत सुविधा, लष्करी तळ आणि औद्योगिक प्रतिष्ठानांचे गंभीर नुकसान झाले आहे. या हल्ल्यांमध्ये तीन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अनेक जण जखमी झाले आहेत.
युक्रेनने हा हल्ला करुन रशियाला इशारा दिला आहे की, आम्ही तुमच्या अंतर्गत ठिकाणांवर हल्ला करु शकतो, यातून हेच स्पष्ट होते की, युक्रेन मागे हटायला तयार नाही. बलाढ्य रशियाच्या नाकीनऊ आणण्याचा यु्क्रेनकडून प्रकार होत आहे. ही युद्धाच्या बदलत्या स्वरूपाची झलक असून पारंपारिक लढाईऐवजी जिथे तंत्रज्ञान आणि ड्रोन हल्ले वाढवले जात आहेत कारण ते अधिक प्रभावी ठरत आहेत. युक्रेनने रशियावर मोठा ड्रोन हल्ला केला, ज्यामध्ये किमान तीन लोक ठार झाले. हे हल्ले रशियातील समारा, पेन्झा आणि रोस्तोव्ह सारख्या भागात झाले, जिथे पडलेल्या ड्रोनच्या ढिगाऱ्यांमुळे घरांना आग लागली आणि एका सुरक्षा रक्षकाचाही मृत्यू झाला. पेन्झा येथील इलेक्ट्रॉनिक कारखान्यावर झालेल्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. युक्रेनियन गुप्तचर संस्थांच्या मते, या हल्ल्यांचे मुख्य लक्ष्य रियाझान तेल शुद्धीकरण कारखाना, व्होरोनेझ तेल साठवणूक आणि प्रिमोर्स्को-अख्तरस्क लष्करी विमानतळ होते. याशिवाय, रशियाच्या लष्करी औद्योगिक व्यवस्थेसाठी महत्त्वाचे मानले जाणारे एक महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक्स कारखाना देखील नुकसानग्रस्त झाले. युक्रेनच्या या रणनीतीवरून असे दिसून येते की ते आता केवळ आघाडीवरच नाही तर शत्रूच्या मुळावरही हल्ला करत आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने युक्रेनमधून ३३८ ड्रोन यशस्वीरित्या नष्ट केले. त्याच वेळी, युक्रेनियन हवाई दलाने सांगितले की रशियाने त्यांच्यावर ५३ ड्रोन हल्ले केले. त्यापैकी ४५ पाडण्यात आले. दरम्यान, रशियाने आणखी एक मोठा दावा केला आहे की त्यांनी पूर्व युक्रेनमधील एका गावावर नियंत्रण मिळवले आहे. मात्र, या दाव्याची निश्चिती झालेली नाही. जर ते खरे असेल तर ते युक्रेनसाठी आणखी एक धोरणात्मक धक्का असू शकते.